मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाचा तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी असून सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपामध्येच शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, रविंद्र चव्हाण यांचे आई वडील कोणी आमदार नव्हते, त्यांच्या पाठीशी कुटुंबाचा उद्योग व्यवसाय नव्हता. ते पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोकणातील गावागावात जाऊन पक्षाचा विस्तार केला आणि पक्षाला यश मिळवून दिले. असे दैवदुर्लभ कार्यकर्ते ही भाजपाची संपत्ती आहे. कार्यकर्त्यांच्या त्याग व बलिदानामुळे पक्ष मोठा झाला आहे. त्यांच्या रुपाने आपल्यातील एक कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाल्याचा कार्यकर्त्यांना आनंद आहे. काँग्रेस पक्ष सत्तेच्या 60 वर्षात जे काम करू शकला नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या अकरा वर्षात देशात झाले आहे. पण अजूनही काम करायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्सची करून जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकार ताकदवान आहे. त्यासोबत रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संघटनही मजबूत असेल. दोन्हीच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित राज्यात शिवशाही आणू असा विश्वास आहे. पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव करताना नितीन गडकरी म्हणाले की, पक्षाचा संघर्षशील कार्यकर्ता किती मोठा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रात्रं दिवस प्रवास करून पक्षासाठी काम केले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचे गडकरीनी नमूद केले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी