रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : येथील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठ जुलै रोजी रत्नागिरीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी लोकांनी उद्योग व्यवसाय करावा आणि उद्योजकांनी एकमेकांच्या साथीने व्यवसायवृद्धी करावी, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी विभागाचा सातवा वर्धापन दिन रत्नागिरीच्या हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे ८ जुलै रोजी दुपारी ३ ते रात्रौ ८ या वेळेत पार पडणार आहे. याच कार्यक्रमात गद्रे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
एकमेकां साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत हा ध्यास घेऊन ब्रिज इंजिनीयर माधवराव भिडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना २००० साली झाली. मराठी माणसा, शक्य तितक्या लवकर नोकरी सोड आणि व्यवसाय कर असा संदेश देत, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यामध्ये १२० पेक्षा अधिक चॅप्टरची स्थापना केली.
भारताबाहेर दुबई येथे असे ५००० पेक्षा जास्त मराठी उद्योजक याचे सभासद आहेत. रत्नागिरी विभागाची स्थापना ८ जुलै २०१८ साली झाली. या विभागाचा सातवा वर्धापन दिन येथे ८ जुलै रोजी साजरा होणार आहे. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अजित मराठे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे आणि प्रोमो डेव्हलपर्सचे संचालक तुषार जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
जास्तीत जास्त मराठी उद्योजकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी