कर्जत तालुक्यातील जुना दगडी पूल वाहतुकीस तात्काळ बंद
रायगड, 1 जुलै, (हिं.स.)। जव्हार-वाडा-भिवंडी-कल्याण कर्जत या राज्य मार्ग क्रमांक 76 वरील कर्जत तालुक्यातील की.मी. 115/700 या नेरळ पोलिस स्टेशन नजीकच्या जुन्या दगडी बांधकामातील पुलाची स्ट्रक्चरल ऑडिटकरिता पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान कर्जतकडील ब
कर्जत तालुक्यातील जुना दगडी पूल वाहतुकीस तात्काळ बंद


रायगड, 1 जुलै, (हिं.स.)। जव्हार-वाडा-भिवंडी-कल्याण कर्जत या राज्य मार्ग क्रमांक 76 वरील कर्जत तालुक्यातील की.मी. 115/700 या नेरळ पोलिस स्टेशन नजीकच्या जुन्या दगडी बांधकामातील पुलाची स्ट्रक्चरल ऑडिटकरिता पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान कर्जतकडील बाजूस असलेल्या पुलाच्या खांबाच्या तळातील काही भाग नादुरूस्त आढळून आल्याने सदर पुलावरून वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ही तातडीची कार्यवाही करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल संदिप चव्हाण यांनी कळविले आहे.

ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येताच तात्काळ पाहणी व कार्यवाही करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अखत्यारीतील पुलांची वेळोवेळी नियतकालीक पाहणी करण्यात येत असते. सदर पूल जुना व दगडी बांधकामाचा असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट नियोजितपणे करण्यात आले होते.

या पुलास समांतर नव्याने बांधलेला दुसरा आसीसी पूल अस्तित्वात असल्यामुळे वाहतूक त्या पुलावरून सुरू ठेवण्यात आली असून सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे. सामाजिक माध्यमांवर किंवा काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी कळविल्यानंतरच विभागाने कार्यवाही केली असा चुकीचा संदेश प्रसारित होत आहे, त्यात कोणताही तथ्याधार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही बाब स्वतःच्या निरीक्षणाद्वारे ओळखून आवश्यक ती सर्व कार्यवाही तात्काळ केली आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande