शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर राज्यात प्रथम
कोल्हापूर, 1 जुलै (हिं.स.) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून Performance Grading Index- PGI नुसार शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते. यासाठी युडायस प्लस माहिती, राष्ट्रीय संपाद
शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर राज्यात प्रथम


कोल्हापूर, 1 जुलै (हिं.स.) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून Performance Grading Index- PGI नुसार शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते. यासाठी युडायस प्लस माहिती, राष्ट्रीय संपादणूक पातळी व इतर शैक्षणिक माहिती अशी एकूण 72 दर्शकांसाठी एकूण 600 गुणांचे गुणाकंन केले जाते. या गुणांकनाच्या आधारे राज्याचे देशातील तसेच जिल्ह्याचे राज्यातील शैक्षणिक निर्देशकांमधील स्थान निश्चित करण्यात येते.

दिनांक 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकाच्या आधारे शाळास्तरावरुन युडायस प्लस या प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची शाळा, विद्यार्थी व शिक्षक विषयक माहिती संगणकीकरण करण्यात येते तसेच राष्ट्रीय संपादणूक पातळी (NAS) परिक्षा घेण्यात येते. सन 2023-24 च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्याने एकूण 600 पैकी 345 गुण प्राप्त करुन महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थान पटकावले तर सातारा व्दितीय व सोलापूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मिशन उत्कर्ष हा उपक्रम राबवला. शैक्षणिक निर्देशांकामध्ये सुधारणा करण्यासाठी कोल्हापूर शिक्षण विभागाने खालीलप्रमाणे कामकाज केले.

मागील शैक्षणिक निर्देशांकामधील कमी गुण मिळालेल्या निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला. या निर्देशांकामध्ये सुधारणा होण्यासाठी जिल्हास्तरावरुन कालबध्द कार्यक्रम निश्चित केला. मिशन उत्कर्षची दिनदर्शिका तयार करण्यात आली व त्याची अमंलबजावणी करण्यात आली. (उदा. रेनवॉटर हार्वेस्टींग ही सुविधा सर्व शाळांमध्ये दिनदर्शिकानुसार एकाच दिवशी उपलब्ध करण्यात आली.) शैक्षणिक निर्देशांकामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेझेंटेशन तयार करुन सर्व तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले. युडायस प्लस प्रणालीमध्ये शाळांकडून माहिती भरुन घेवून ही माहिती तपासणीसाठी तालुकास्तरीय कक्ष स्थापन केले. जिल्हास्तरावरुन केलेल्या नियोजनाप्रमाणे कामकाज पूर्ण होण्यासाठी व त्याचा आढावा घेण्यासाठी संपर्क विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. युडायस प्लस प्रणालीमध्ये मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती तपासून त्यामधील त्रुटी दुरुस्ती करुन घेण्यात आली. शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात शाळांच्या भौतिक सुविधासाठी एकूण 190 गुण आहेत. स्वच्छतागृह दुरुस्ती, बांधकाम, रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा बाबींसाठी वेळोवेळी निधीची उपलब्धता करुन देवून जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक निर्देशांकामध्ये सुधारणेसाठी मोलाचे सहकार्य केले.

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या दोन दिवशीय राज्यस्तरीय बैठकीमध्ये सन 2023-24 च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थान पटकावल्याबद्दल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देवोल, आयुक्त (शिक्षण) पुणे सचिंद्र प्रताप सिंग, प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे शरद गोसावी यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर व जिल्हा डायटचे प्राचार्य डॉ. राजेद्र भोई यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव करण्यात आला.

----------------

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande