कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा - डॉ. सुभाष घुले
कोल्हापूर, 1 जुलै (हिं.स.)। भौगोलिक मानांकन अंतर्गत गुळ उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे आवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जीआय नोंदणी करावी, जेणेकरुन कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यास मदत होईल. कृषी पणन मंडळाच्या योजनांचा फायदा गूळ उत्पादकांनी घ्यावा त
कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा - डॉ. सुभाष घुले


कोल्हापूर, 1 जुलै (हिं.स.)। भौगोलिक मानांकन अंतर्गत गुळ उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे आवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जीआय नोंदणी करावी, जेणेकरुन कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यास मदत होईल. कृषी पणन मंडळाच्या योजनांचा फायदा गूळ उत्पादकांनी घ्यावा तसेच केंद्र शासनाच्या शेतमाल निर्यातीबाबत कामकाज करणाऱ्या संस्थे (अपेडा) च्या माध्यमातून गुळ निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअर असोसिएशन हॉल, उद्यमनगर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन गुळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विद्यासागर गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपेडाचे सहाय्यक व्यवस्थापक पांडूरंग बामने, कणेरी मठ येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. पांडूरंग काळे, गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासाहेब पाटील, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, सुयोग टकले व गुळ उत्पादक उपस्थित होते.

अपेडाचे पांडूरंग बामने यांनी अपेडाच्या योजना, निर्यात क्षेत्रातील संधी, गॅप प्रमाणपत्र, गुळाची मागणी, गुळ प्रक्रीया बाबत मार्गदर्शन केले. प्रा. पांडूरंग काळे यांनी गुळ उत्पादन वाढीबाबत व त्याच्या प्रतवारी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. गेडाम यांनी गुळ उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असल्याचे नमूद करुन चांगल्या प्रतीचा गुळ तयार करण्याबाबत सांगितले. गुळ उत्पादकांनी उत्तम प्रतीचा सेंद्रीय गुळ उपलब्ध करुन दिल्यास कोल्हापूरी गुळाची निर्यात करु, असे गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासाहेब पाटील यांनी नमुद केले. तसेच विविध देशांच्या प्रतवारी मानकांबाबत मार्गदर्शन केले.

गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांनी अपेडा कडे संपर्क केल्यास त्याबाबत मदत केली जाईल, असे बामने यांनी सांगितले. या कार्यशाळेस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातीन गुळ उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा संपल्यानंतर गूळ संशोधन केंद्राच्या गुऱ्हाळ गृहाला भेट देण्यात आली. यावेळी डॉ. गोविंद येनके यांनी सर्वांना प्रकल्पा विषयी सविस्तर माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande