अहिल्यानगर, 1 जुलै, (हिं.स.)। हरित क्रांतीचे प्रणेते, समाजसुधारक वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये दिशा दिली. वसंतराव नाईक हे एक प्रसिद्ध कृषीतज्ज्ञ आणि प्रगतीशील शेतकरी होते. त्यांना हरित क्रांती, पंचायत राज, श्वेत क्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. नाईक यांनी कृषी संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून देशभरात उत्कृष्ट कार्य केले त्यांनी आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे व्यक्तिमत्त्व उंचावले. १९७२ मध्ये महाराष्ट्रात आलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दूरगामी योजना राबवल्या. वसंतराव नाईक हे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल केवळ जागरूक नव्हते, तर त्यांनी दूरगामी उपाययोजनाही केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांचे नाते नेहमीच दृढ होते. कठीण काळातही नाईक यांनी क्रांतिकारी काम केले. म्हणूनच त्यांना 'शेतकऱ्यांचा राजा' आणि 'हरित योद्धा' म्हटले जाते, असे प्रतिपादन मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni