गटशेती ही शाश्वत शेतीचा पर्याय - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड, 1 जुलै (हिं.स.)। शेतीमध्ये प्रगती साधायची असेल, तर गटशेती करणे ही काळाची गरज आहे. गटशेती ही शाश्वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कै. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषिदिनानिमित्त आज जिल्हा प
गटशेती ही शाश्वत शेतीचा पर्याय - नांदेड जिल्हाधिकारी


नांदेड, 1 जुलै (हिं.स.)। शेतीमध्ये प्रगती साधायची असेल, तर गटशेती करणे ही काळाची गरज आहे. गटशेती ही शाश्वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कै. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषिदिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग व पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गटशेतीमुळे मजुरांच्या टंचाईचा प्रश्न कमी होतो. तसेच उत्पादन खर्च घटून शेती उत्पादन वाढते. उमेदच्या माध्यमातूनही गटशेतीचे यशस्वी प्रयोग करता येऊ शकतात. चालू वर्षात किमान 200 शेतीगट तयार करण्याचा निर्धार असल्‍याचे मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केले. पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येणार असून, कपाशी वेचणी दरम्यान होणारे नुकसान लक्षात घेऊन 15 ते 20 हजार शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर कापूस वेचणी बॅग देण्यात येणार आहेत. तसेच पोखरा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी राहल कर्डिले यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नैसर्गिक शेती, परसबाग व हळद प्रक्रिया या पत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून, पारंपरिक पद्धतींसोबत नवतंत्रज्ञान स्वीकारणे हे अत्यावश्यक आहे. लोकसंख्या वाढत असताना शेतीचे क्षेत्र स्थिर आहे, त्यामुळे ड्रोन फवारणी, नैसर्गिक शेती, बायो फर्टिलायझर, ड्रिप इरिगेशन यांचा वापर करणे गरजेचे असल्‍याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद उपकर योजनेत सन 2025-26 साठी शेतकरी उत्पादन कंपनी व गटशेती करणाऱ्यांना किसान ड्रोन व बायो फर्टिलायझर लॅबसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. किसान ड्रोन साठी चार लाखांपर्यंत तर बायो फर्टिलायझर प्रयोगशाळेसाठी 10 ठिकाणी दीड लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नैसर्गिक शेती करणाऱ्या 82 शेतकऱ्यांना प्रमाणिकरण प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. पाणी फाउंडेशनचे संतोष शिनगारे, नैसर्गिक शेती प्रमाणिकरणचे हर्षल जैन, अमोल केंद्रे, प्रगतिशील शेतकरी भगवानराव इंगोले, विशाल शिंदे, उत्तम सोनकांबळे, महमंद गौस आदींनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. जिल्हा कृषी अधिकारी सचिन कपाळे यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande