पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष असा राजकीय
प्रवास
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची आज, मंगळवारी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ठाणे आणि डोंबिवलीला राष्ट्रीय राजकारणात विशेष महत्व आले आहे. भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ते नगरसेवक, आमदार, संपादक, मंत्री, पालकमंत्री, भाजपचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष ते आता प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा सगळ्यांना थक्क करणारा आहे.
एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील ऐतिहासिक उठाव, त्यांच्या तत्कालीन मंत्री, 40 आमदारांचा सुरत व्हाया गुवाहाटी असा झालेला प्रवास आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ या सर्व घडामोडीमध्यें नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच ठाणे जिल्ह्यासह कोकणात शिवसेनेला मागे टाकून भाजपला सक्षम बनवले. यांचे वडील दत्तात्रय चव्हाण हे नोकरी निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील पेंडूर गावातून भांडुपला राहायला आले. मुंबईचे उपनगर असलेल्या आणि कोकणी माणसांनी गजबजलेल्या भांडुपमध्ये 20 सप्टेंबर 1970 मध्ये रविंद्र यांचा जन्म झाला. संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण हे मुंबईत झाले. बारावीपर्यंत नियमित शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून पुढील शिक्षण घेतले. त्यांच्यावर महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव होता. चव्हाण यांच्या वडिलांनी भांडुप सोडून डोंबिवलीला राहण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी डोंबिवलीत युवा मोर्चाचे काम सुरू करीत राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.
भारतीय युवा मोर्चाचे काम करताना रविंद्र चव्हाण यांनी 2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या सक्रिय राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत चव्हाण सेनेसह भाजपच्या प्रस्थापितांना मागे टाकून डोंबिवलीच्या सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. अध्यक्षपदाच्या काळात केलेल्या कामामुळे त्यांनी पक्ष अधिक मजबूत केला आणि डोंबिवली या नवीन विधानसभा मतदार संघात मनसेच्या उमेदवाराचा 61 हजार 104 मतांच्या फरकाने पराभव करीत सांस्कृतिक उपराजधानी समजल्या जाणाऱ्या सुशिक्षित डोंबिवलीकरांचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या कल्याण जिल्हा अध्यक्षपदाची यशस्वीरित्या धुरा सांभाळली. जशी जशी त्यांची राजकीय वाटचाल वेगाने वाढू लागली तसे त्यांचे अंतर्गत विरोधक ही वाढू लागले. त्यांच्या विरोधात झालेल्या स्वकीयांच्या बंडासह विरोधकांना न जुमानता चव्हाण हे 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग 4 वेळा आमदार बनले आहेत. सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवलीकरांची बौद्धिक भूक शमविण्यासाठी डोंबिवलीकर मासिक सुरू केले. त्याचे संपादकपद ते भूषवित आहेत.
लोकांशी जोडलेल्या या आमदाराला 2016 मध्ये राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात पहिल्यांदा संधी दिली. तर 2018 मध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदासह पालघरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. तसेच 2019 च्या निवडणुकीत कोकण प्रदेशात सर्वाधिक मते घेऊन विजय मिळवून त्यांनी भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जात असलेल्या ठाणे जिल्ह्यात सलग 2 निवडणुकीत सर्वाधिक 9 आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली. त्याचप्रमाणे 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात चव्हाण यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून संघटना बांधणीचे काम केले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलवले. शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढत चव्हाण यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखविली.
महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविंद्र चव्हाण यांची मोलाची साथ होती. शिंदे यांचे बंड यशस्वी करण्यामध्ये रविंद्र चव्हाण यांची रणनीतीदेखील पोषक ठरली. त्यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले. त्याचबरोबर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सोपविण्यात आले. पालकमंत्री पदाचा योग्य वापर करीत सामान्य जनतेच्या सेवेबरोबर भाजपची ताकदही वाढविली आणि आज कोकणात भाजपचा बोलबाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात 2024 मध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यावर चव्हाण यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आले नाही. चव्हाण यांच्या ऐवजी गणेश नाईक यांना संधी देण्यात आल्याने चव्हाण यांच्यावर पक्ष बांधणीसाठी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक निवडणुका झाल्यावर चव्हाण यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. चव्हाण यांच्या रूपाने डोंबिवलीच नव्हे तर ठाणे जिल्हा, कोकणाला पहिल्यादाच पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. गेल्या 3 वर्षांमध्ये ठाणे जिल्हा हा राजकीय घडामोडीचा केंद्र बनला. पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुखपद लाभले. या आता चव्हाण यांच्या रूपाने दुसरा मराठा आमदार हा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचे नेतृत्व करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या चव्हाण यांच्या खांद्यावर राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची जबाबदारी राहणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी