अमरावती : प्रवासादरम्यान बसमधून सीडबॉल्स फेकत जा; कृषिदूतांचा प्रवाशांना संदेश
अमरावती, 4 जुलै, (हिं.स.) पर्यावरणाला जपण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन अतिशय महत्वाचे असून, ही बाब लक्षात घेता येणाऱ्या काळात वृक्षारोपण व्हावे, यासाठी तिवसा येथील आर. जी. देशमुख कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्राच्या कृषिदूतांनी तब्बल १० हज
गावी जाताय ना, प्रवासादरम्यान बसमधून सीडबॉल्स फेकत जा!: वृक्षारोपणासाठी कृषिदूतांचा प्रवाशांना संदेश, 10 हजार सीडबॉल निर्मिती‎


अमरावती, 4 जुलै, (हिं.स.)

पर्यावरणाला जपण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन अतिशय महत्वाचे असून, ही बाब लक्षात घेता येणाऱ्या काळात वृक्षारोपण व्हावे, यासाठी तिवसा येथील आर. जी. देशमुख कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्राच्या कृषिदूतांनी तब्बल १० हजार सीडबॉलची निर्मिती करून वृक्षारोपणाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे सीडबॉल्स बनवून बसने प्रवास करणाऱ्या लोकांना गावी जाताय ना मग जा. पण, बसमधून सीडबॉल फेकत जा, असा संदेश कृषिदूतांनी नागरिकांना दिला. बस स्थानकावरील प्रवाशांच्या हाती सीडबॉल्स देण्यात आले. हे सीडबॉल्स नागरिक माळरान, रिकामी मैदाने, रस्त्याच्या कडेला, एसटी बस आडवळणाला थांबली की त्या ठिकाणी फेकत आहेत. त्यामुळे सीडबॉल्समधील बीज ते जेथे फेकले तेथे मुरून रोपटे उगवणार आहे. त्यामुळे ही वसुंधरा आणखीनच हिरवी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या हस्ते ठिकठिकाणी सीडबॉल्स फेकले जात असून, यामुळे वृक्षारोपणाचा एक सुंदर उपक्रम कृषिदूतांनी तिवसा तालुक्यात राबवला.

या उपक्रमात तिवसा तालुक्यातील विविध गावातील नागरिकांचा मोठा संख्येने सहभाग राहिला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १० हजार सीडबॉल्सची निर्मिती केली. या सीडबॉल्सच्या निर्मितीसाठी माती, शेण, कंपोस्ट आणि कडूनिंब, चिंच, जांभूळ या वृक्षांच्या बियांचा उपयोग करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध स्थळांसह बसस्टॉपहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पाच-पाच सीडबॉल्स देऊन त्यांना ते कुठे फेकायचे. यामुळे तुम्ही वृक्षारोपणाला कसा हातभार लावू शकता, याबद्दल माहितीही दिली. अशाप्रकारे गावातील नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या उपक्रमामुळे किमान ५० टक्के बीज जमिनीत रुजले तरीही या विद्यार्थ्यांनी राबवलेला उपक्रम निसर्गासाठी वरदान ठरणार आहे, एवढे निश्चित. हा उपक्रम प्राचार्य अरुण डहाके तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. सावंत राठी, सहायक प्रा. मनोज लुंगे यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आला. या उपक्रमासाठी विद्यार्थी वैष्णवी बेहरे, प्राची नांदेकर, पूर्वा ठवकर, समीर जिभकाटे, तुषार रेवतकर यांनी परिश्रम घेतले. बीज गोळा करण्यासाठी तसेच त्यापासून सीडबॉल्सच्या निर्मितीसाठी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी माती, शेण, कंपोस्ट खतही मिळवावे लागते. वेळ द्यावा लागतो. तसेच सीड बॉल्स तयार करून त्यांचे वितरणही करावे लागते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande