अमरावती, 4 जुलै, (हिं.स.)
धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत तालुक्यात कारला येथील अनुदानित आश्रम शाळेच्या सिकलसेल आजाग्रस्त विद्यार्थिनीचा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अनिता रामसिंग बिबेकर, असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती कारला येथील अनुदानित आश्रम शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी होती. तिचा बुधवारी (ता. दोन जुलै) अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता ही सिकलसेल पॉझिटिव्ह होती. तिची तब्बेत बिघडल्यानंतर तिला अमरावती येथील इर्विन दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अनीता ही मुळची शेंबा (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथील रहीवासी होती. घटनेची माहिती मिळताच धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून सहायक प्रकल्प शिक्षण अधिकारी जवाहर गाढवे हे इर्विन दवाखान्यात पोहोचले.
सानुग्रह अनुदानाचे आश्वासन
अनीता बिबेकर हिला कारला आश्रम शाळा संस्थेकडून एक लक्ष् रुपये आणि आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत एक लाख रुपये सानुग्रह निधी दिला जाणार असल्याचे आश्वासन विभागाकडून मृत अश्विनीच्या पालकांना देण्यात आले आहे.
...तर कदाचित वाचला असता जीव
शासकिय माध्यमिक आश्रम शाळा किन्हीराजा (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील माध्यमिक मुख्याध्यापक संगीतराव गोतमारे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला अमरावती आदिवासी विभागातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी उपस्थित झाले होते. त्याऐवजी अनिताच्या नाजुक परीस्थितीची दखल घेऊन तिला उपचाराकरिता नागपूर किंवा इतरत्र ठिकाणी दाखल केले गेले असते तर तिचा जीव कदाचीत वाचला असता. मात्र, आदिवासी विभागाचा बेजबाबदारपणा म्हणा किंवा अनिताचे दुर्देव, तिला जीव गमवावा लागला.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी