अमरावती, 1 जुलै, (हिं.स.) शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. वाहचालकांचे जिव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य नागरिक मात्र त्रस्त झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे किरकोळ अपघात घडले आहेत. जनावरांनी काही नागरिकांवर हल्ला केला असून दुचाकीस्वारांचेही अपघात घडले आहेत. त्यामुळे या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
अमरावती, नागपूर, बडनेरा - अकोला, अशा महामार्गांसह काँग्रेसनगर, नवसारी, एमआयडीसी रोड, वडाळी, विद्यापीठ, शेगावनाका अशा मध्यवर्ती तसेच शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रुख्मिणीनगर ते काँग्रेसनगर या रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात. या रस्त्यावर एक महाविद्यालय, शाळा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा किरकोळ अपघात घडले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी