वर्धा, 1 जुलै (हिं.स.)। शेतक-यांनी शेतीचा खर्च कमी करुन जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पन्नामध्ये भरीव वाढ निश्चितच होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आज कृषि दिन कार्यक्रमात केले.
हरीत क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस कृषि दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आज जिल्हा परिषदच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात कृषि दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यामध्ये दुग्ध क्रांती घडवून आनण्यासाठी शेतक-यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाकडे वळावे. पारंपारिक शेती ऐवजी पिकांमध्ये बदल करुन अन्न प्रक्रिया उद्योग शेतक-यांनी सुरु करावे. कृषि शेत्रामधील नाविन्यपुर्ण बाबीची माहिती घेऊन तसेच शेती पिकांबद्दल अभ्यास करुनच शेती करावी, असे पुढे बोलतांना सोमण म्हणाले.
जीवन कतोरे यांनी कापूस, सोयाबीन व तूर पिकांचे व्यवस्थापन व पिक संरक्षण तसेच शेतक-यांनी आपले उत्पन्न कसे वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी किटकनाशक फवारणी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी या भिंतीपत्रकाचे मुख्यकार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच शेती मध्ये भरीव काम करुन दुस-यासाठी आदर्श निर्माण करणा-या 8 शेतक-यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने