मुंबई, 1 जुलै (हिं.स.) : राज्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखालील वाहतूकदार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्याच वेळी शाळा बस मालक संघटनेनेही 2 जुलैपासून संपाची घोषणा केली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
वाहतूकदार संघटनांच्या म्हणण्यानुसार, परिवहन विभाग आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या अकारण अडवणुकीविरोधात ते हे पाऊल उचलत आहेत. ऑनलाईन दंड आकारणी, दंडाची वाढती रक्कम, थकीत दंड माफी, क्लिनरची सक्ती रद्द करणे, व्यावसायिक वाहनांच्या प्रवेश वेळांबाबत पुनर्विचार, आणि वाहनतळ उपलब्ध करून देणे या मुख्य मागण्यांसह त्यांनी आंदोलन छेडले आहे. राज्यभरातील सर्व वाहतूक संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला असून, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी संपाची माहिती दिली. दरम्यान, स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी देखील 2 जुलैपासून स्कूल बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वाहतूक पोलिसांकडून बस चालकांवर होणारी कारवाई, सीसीटीव्ही, जीपीएस व वेबरेडरच्या कारणावरून होणारे दंड, परवानगी प्रक्रियेत अडथळे याला विरोध दर्शवण्यात आला आहे. या संपामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाळांनी तात्पुरते ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा विचार करावा, किंवा वेळापत्रकात बदल करावा, अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच पालकांनी मुलांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. याआधीही आंदोलकांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले होते, मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचे वाहतूक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा संप केवळ तात्पुरता नसून मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्य शासनाने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा संपूर्ण वाहतूक सेवा ठप्प होऊन सामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule