अहिल्यानगर, 1 जुलै, (हिं.स.)। स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्याने तसेच हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना लाभ झाला. अहिल्यानगर जिल्हा तर कृषी क्षेत्र तसेच दुधासारख्या जोड धंद्यातही राज्यात अग्रेसर आहे. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी शेतीला उर्जितावस्थेत नेण्यासाठी अनेक पावले उचलली. परिणामी या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. प्रगतीशील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून अधिकचे उत्पादन मिळवले आहे.सर्व शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहचविण्यासाठी प्रशासन कटि बध्द आहे.खतांची उपलब्धता होण्यासाठी आता ब्लॉगस्पॉट ही सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे ध्येय समोर ठेवून शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमल बजाणीचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन, शेतकरी मेळावा व शेतकरी पुरस्कार कार्यक्रम अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच रासायनिक खतांच्या उपलब्धतेची सहज माहिती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्लॉगस्पॉटचे अनावरण करण्यात आले.
शामसुंदर कौशिक यांनी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच पीक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिकीकरण आणि कृषी क्षेत्रात भरीव काम करण्याचे आव्हान होते. सिंचनाच्या व्यवस्थेमुळे कृषी क्षेत्राला लाभ झाला.ऐतिहासिक अहिल्या नगर जिल्ह्यात पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना उभा करून सहकाराची मुहुर्तमेढ रोवली. शेती व सहकार अशा जोडीमुळे शेतकऱ्यांना मोठी लाभ झाला. अशा जिल्ह्याचा सीईओ असणे माझ्यासाठीही अभिमानाची बाब आहे.या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, जिल्हा परिषद सेस फंड योजना, नवीन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, राज्य कृषी विभाग यांत्रिकीकरण योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनीही प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni