पडीक शेतीला सामूहिक शेतीचा पर्याय; वर्दे पासून करूया  सुरुवात
बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांचे आवाहन वर्दे येथे कृषी दिन उत्साहात साजरा सिंधुदुर्ग, 1 जुलै (हिं.स.)। शेतात काम करायला माणसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे बऱ्याच शेत जमिनी पडीक राहत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी
कृषी दिन कार्यक्रमात बोलताना कुडाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर.


बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांचे आवाहन

वर्दे येथे कृषी दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग, 1 जुलै (हिं.स.)। शेतात काम करायला माणसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे बऱ्याच शेत जमिनी पडीक राहत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीचा विचार करणे आवश्यक आहे. सामूहिक शेतीची ही सुरुवात वर्दे गावापासून करूया असे आवाहन कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. वर्दे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मेळाव्यानंतर वर्दे येथील जनार्दन गंगाजी कुंभार यांच्या शेतात भाताच्या रत्नागिरी ८ या वाणाच्या श्री पद्धतीच्या लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत आवारात वृक्षलागवड सुध्दा करण्यात आली.

पंचायत समिती कुडाळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत वर्दे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वर्दे ग्रामपंचायत हाॅल येथे कृषी दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मुळदे विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता विजय दळवी, वर्दे सरपंच महादेव पालव, उपसरपंच प्रदिप सावंत,जि.प.चे समाजकल्याण अधिकारी बाळकृष्ण परब, निवृत्त प्राध्यापक शरद नाईक, कृषी अधिकारी सचिन चोरगे, तालुका कृषी अधिकारी गायत्री तेली, विस्तार अधिकारी श्री.खरात आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय दळवी म्हणाले की, आधार कार्ड प्रमाणे एग्रीस्टॅक महत्वाचा आहे.शेतकरी भाताच्या बोनसापासून वंचित आहे.जे शेतकरी खरेदी विक्री संघात भात विकतात त्यांनाच बोनस मिळतो. जर अन्य ठिकाणी भात विक्री केली तर खरेदी विक्री स़घात त्यांची नोंदणी करा म्हणजे ते शेतकरी भाताच्या बोनसपासून वंचित राहणार नाही असे आवाहन केले. त्याच बरोबर शेतात मशिनरीचा सुध्दा विचार केलाच पाहिजे.नव्हे आता मशिनरींची गरजच आहे.जमीन ही जीवंत आहे, जमीन ही बोलते, झाडे सुद्धा बोलतात. तुमची आवड निवड बदला. काही आवश्यकता असेल तर जरुर या, आम्ही मार्गदर्शन करु असे प्रतिपादन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.विजय दळवी यांनी केले.

प्रफुल्ल वालावलकर म्हणाले की,आजच्या कृषी दिनी सामुहिक शेतीचा प्रयोग करावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत,जेणेकरून आपला हा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवाला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली व शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. .बाळकृष्ण परब यांनी पारंपारिक व अपारंपरिक बियांबाबत माहिती देत समाजकल्याण व महाराष्ट्र ग्रामीण विकास योजनेची माहिती दिली.

शेतकरी-अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

कुडाळ तालुका भातपिक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये संतोष अंकुश गावडे (प्रथम),आनंद रामचंद्र सावंत (द्वितीय),रामचंद्र महादेव केसरकर(तृतीय) यांचा समावेश होता. मात्र एकही शेतकरी उपस्थित न राहिल्याने त्या -त्या भागातील कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला.

सहाय्यक कृषी अधिकारी रोशन मर्गज, सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खर्डे,सविता हरमलकर, ग्रामपंचायत अधिकारी भाग्यश्री सावंत, प्रसन्ना म्हाडगुत,प्रविण चव्हाण, रविकांत सावंत, विष्णू तेर्से, गोविंद तोरसकर, साक्षी पालव, संदिप सावंत, रुपेश नाईक, सतिश साळगावकर, तांत्रिक कर्मचारी मंदार पाटील, संकेत पुनाळेकर,रूपेश चव्हाण आदीचा सन्मान करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande