नंदुरबार - क्रीडा विषयक अनुदान योजनांसाठी प्रस्ताव सादर करावे : सुनंदा पाटील
नंदुरबार, 1 जुलै, (हिं.स.) शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा विषयक अनुदान योजनांसाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती सुन
नंदुरबार - क्रीडा विषयक अनुदान योजनांसाठी प्रस्ताव सादर करावे : सुनंदा पाटील


नंदुरबार, 1 जुलै, (हिं.स.) शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा विषयक अनुदान योजनांसाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पकान्वये केले आहे. यामध्ये सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना या घटकांचा समावेश असून व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना आणि युवक कल्याण योजना या योजनांचा समावेश आहे.

योजनांचे तपशील:

अ. व्यायामशाळा विकास योजना:

 नवीन व्यायामशाळा बांधकामासाठी कमाल रुपये 14 लाख अनुदान मंजूर केले जाईल.

 व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जुनी असलेली), व्यायामशाळा साहित्य खरेदी आणि खुले व्यायामशाळा साहित्य यासाठी कमाल रुपये 7 लाख अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय आणि शासकीय कार्यालये या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यास पात्र आहेत.

ब. क्रीडांगण विकास योजना:

 या योजनेत क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे/तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेंजिंग रूम बांधणे, पिण्याच्या पाण्याची व मैदानावर मारण्यासाठी पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फ्लड लाइटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी/आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसवणे व मैदानावर रोलिंगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे या अनुदान बाबींसाठी कमाल रुपये 7 लाख अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.

 क्रीडा साहित्यासाठी रुपये 3 लाख अनुदान मंजूर केले जाईल.

 शंभर टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय

शाळा या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यास पात्र आहेत.

क. युवक कल्याण योजना:

 या योजनेत ग्रामीण/नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर आणि सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी कमाल रुपये 25 हजारापर्यंत अनुदान पात्र संस्थांना मंजूर केले जाईल.

इच्छुक पात्र संस्थांनी योजनानिहाय विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत. परिपूर्ण

प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये माहे जुलै २०२५ अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष सादर

करावेत. प्राप्त झालेल्या प्रस्तावांना प्राधान्यक्रमाने मंजुरी दिली जाईल, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती

पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande