अहिल्यानगर - २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस शासन सकारात्मक -उदय सामंत
मुंबई, 1 जुलै (हिं.स.)। अहिल्यानगर महानगरपालिकेतील २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात असून, त्याच्या वेतनवाढीबाबत शासन सकारात्मक विचार करेल. तसेच राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांचे आकृतीबंद मंजूर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण क
अहिल्यानगर - २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस शासन सकारात्मक -उदय सामंत


मुंबई, 1 जुलै (हिं.स.)। अहिल्यानगर महानगरपालिकेतील २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात असून, त्याच्या वेतनवाढीबाबत शासन सकारात्मक विचार करेल. तसेच राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांचे आकृतीबंद मंजूर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल असे, मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सत्यजीत तांबे, मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, अमित गोरखे, योगेश टिळेकर, जा. मो. अभ्यंकर यांनी सहभाग घेतला.

मंत्री सामंत म्हणाले की, अहिल्यानगर महानगरपालिकेचे एकूण वार्षिक बजेट सुमारे ५१६ कोटी रुपये इतके आहे. यातील ६१.८९ टक्के खर्च आस्थापनेवर जात आहे. ही टक्केवारी शासनाच्या नियमानुसार ठरवलेल्या ३५ टक्के मर्यादेपेक्षा खूपच जास्त असल्यामुळे, इतर नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी केवळ सुमारे २१६ कोटी रुपयेच उरतात. सध्या महानगरपालिकेत १५०२ कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी ४०१ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत, तर हे २८ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वायरमन, पंपचालक, वाहनचालक आदींचा समावेश आहे. या २८ कर्मचाऱ्यांना कायम केले गेले, तर इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडूनही कायम नियुक्तीची मागणी होईल, आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चावर अधिक ताण येईल. यामुळे सद्यस्थितीत ही मागणी मान्य करणे व्यवहार्य नाही. राज्यातील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांसाठी शासनाने आधीच स्पष्ट धोरणे तयार केली आहेत. ला.ड.पागे योजनेसह सफाई कामगार आणि इतर संवर्गासाठी शासनाने न्याय देणारे निर्णय घेतले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यात येईल. मुंबई महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आकृतीबंध मंजूर असणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी ही प्रक्रिया प्रलंबित असून, शासनाने ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande