चिपळूणच्या पर्यावरण मंडळाची पावनखिंड यात्रा यशस्वी
रत्नागिरी, 14 जुलै, (हिं. स.) : गेल्या १२ आणि १३ जुलै या रणसंग्राम दिनी चिपळूण येथील पर्यावरण मंडळाने पावनखिंड यात्रा करून पराक्रमी लढवय्ये आणि निसर्गास अभिवादन केले. स्वराज्यासाठी पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर १२-१३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी
पावनखिंड यात्रा


रत्नागिरी, 14 जुलै, (हिं. स.) : गेल्या १२ आणि १३ जुलै या रणसंग्राम दिनी चिपळूण येथील पर्यावरण मंडळाने पावनखिंड यात्रा करून पराक्रमी लढवय्ये आणि निसर्गास अभिवादन केले.

स्वराज्यासाठी पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर १२-१३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पावनखिंडीची लढाई झाली. हा मराठा इतिहासातील तेजस्वी अध्याय मानला जातो. या ऐतिहासिक रणसंग्राम दिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने पावनखिंड परिसरात एक दिवसाची पराक्रमी लढवय्ये आणि निसर्ग अभिवादन सहल उत्साहात पार पडली. या सहलीचे संयोजन मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी केले होते.

पर्यावरणप्रेमींसमवेत पावनखिंडीचा इतिहास जाणून घेण्याची आणि निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेण्याची ही पर्वणी ठरली. यावेळी पर्यटन अभ्यासक-लेखक धीरज वाटेकर यांनी पावनखिंड परिसराचा ऐतिहासिक व भौगोलिक मागोवा घेतला. ते म्हणाले, पावनखिंड म्हणजे गजापूरच्या घोडखिंडीत घडलेली रणकथा होय. तेथे मोजके ३००-६०० मराठे मावळे आदिलशाहीच्या १० हजार सैनिकांसमोर उभे ठाकले. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी, शंभूजी जाधव, रायाजी बांदल इत्यादी पराक्रमी मावळ्यांच्या अद्वितीय बलिदानाने ही खिंड पावन झाली.

भव्य बुरुजावरून परिसराचे दर्शन घेतल्यानंतर सहभागी पर्यटकांनी खालील ओढ्यावर असलेल्या पुलावरून स्मृतिस्थळाकडे प्रस्थान ठेवले. ढाल-तलवारींसह भगवा झेंडा फडकत असलेले हे स्मरणस्थळ पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी असल्याने सर्वांनी नतमस्तक होत त्यांना आणि अन्य शूर वीरांना अभिवादन केले.

यावेळी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. विविध संस्थांच्या सहभागातून सुरू असलेल्या प्रबोधन कार्यक्रमात आदरांजली, शाहिरी पोवाडे, इतिहास मार्गदर्शन अशा उपक्रमांमध्ये पर्यावरणप्रेमी सहभागी झाले. स्थानिक गाइड बापू बावकर यांनीही ऐतिहासिक माहिती दिली.

या सहलीत विलास महाडिक, धीरज वाटेकर, विद्याधर अजगोलकर, सखी मंचच्या मायावती शिपटे, विनया देवरूखकर, स्नेहल विचारे, नसरीन खडस, अनघा परचुरे, श्वेता चव्हाण, त्रिशला तलवारे, स्मिता वीरकर, वैशाली जाधव, अलका जोशी, वृषाली शिरगावकर, तेजस्वी मोहिते, नूतन महाडीक, जिज्ञा महाडीक यांचा सक्रिय सहभाग होता.

सहलीच्या समारोपाला पर्यावरणप्रेमींनी सह्याद्रीच्या वाघझरा, कोकणकडा अशा रम्य भागांचे दर्शन घेतले. साडवली-देवरूख परिसरात फुललेल्या दुर्मिळ ‘दिपकाडी कोकणेन्स’ या स्थानिक वनस्पतीचीही माहितीपूर्ण पाहणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande