रत्नागिरी, 14 जुलै, (हिं. स.) : वाडावेसराड (ता. संगमेश्वर) येथील जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धेने पालकमंत्री उदय सामंत यांना आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये नेले. “मी लहानपणी शाळा चुकवून अशा स्पर्धा पाहायला जात असे. आज पुन्हा त्या दिवसांची आठवण झाली,” असे सांगत त्यांनी शेतीशी जुळलेली ही परंपरा जपण्यावर भर दिला. अशा स्पर्धांमुळे शेतीकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होणार असून, नांगरणी स्पर्धा कायम स्वरूपी सुरू ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पावस्करवाडी (वाडावेसराड) येथे काल (दि. १३ जुलै) आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धेमध्ये गावठी आणि घाटी जातीच्या एकूण १०५ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेसाठी ४०० मीटर अंतर निश्चित करण्यात आले होते. नांगरणीच्या साचात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवत ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेनेचे नेते राजेंद्र महाडिक, गावचे गावकर आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन अत्यंत नीटनेटके असल्याचे महाडिक यांनी नमूद केले आणि स्पर्धेला शुभेच्छाही दिल्या.
पारंपरिक शेतीपद्धती, बैलजोड्यांचे जिवंत प्रदर्शन, आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही नांगरणी स्पर्धा विशेष ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी