अमरावती, 14 जुलै (हिं.स.) स्थानिक शंकरनगर मार्गावरील एरिया ९१ रेस्ट्रो बारवर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने छापा टाकून येथून ७० ते ८० युवक युवतींना ताब्यात घेण्यात आले. यात अनेक अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश असल्याचे समजते. रात्री ही कारवाई करण्यात आली.
शंकरनगर मार्गावरील एरिया ९१ रेस्ट्रो बारमध्ये वेडींग पार्टीच्या नावावर आयोजकांनी युवक-युवतींसह अल्पवयीन मुला-मुलींनाही आमंत्रित केले होते. खालच्या बाजूला मिट इन मेल्ट नावाचे दुकान तर त्या बाजूला एरिया ९१ रेस्ट्रो बारचे बोर्ड लागले आहे. त्यावरती दुसऱ्या माळ्यावर खुल्या हॉलमध्ये मुला-मुलींना बोलाविण्यात आले होते. याठिकाणी दारूसह ड्रग्ज पुरविले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसाना मिळाली. या माहितीच्याआधारे गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हान यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एरिया ९१ -रेस्ट्रो बारमध्ये धाड घातली. त्यावेळी - बारमध्ये ७० ते ८० युवक-युवतींसह काही अल्पवयीन मुले-मुली आढळून आली. त्यांना पोलिसानी ताब्यात घेतले. पोलिसांच्या दोन व्हॅनमधून त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व क्यूआरटीची चमूही घटनास्थळी दाखल झाली होती. घटनास्थळी पोलीस उपायुक्त श्याम घुले व सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांनी भेट दिली. हे बार आनंद राजेंद्र भेले याच्या मालकीचे असल्याचे समजते.
१८० पेक्षा अधिक मेडिकलसाठी रवाना
या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण आणि एपीआय महेश इंगोले यांनी सांगितले की, एरिया ९१ रेस्ट्रो बारमध्ये बेकायदेशीर पार्टी आयोजित केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या पार्टीत तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. पोलिसांनी ४० हून अधिक मुलींना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. परंतु उर्वरित मुलांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे ७० ते ८० तरुणांना वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. क्लबमध्ये अजूनही ५० हून अधिक तरुण आहेत ज्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल. ही कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी