लंडन, 2 जुलै (हिं.स.) :
भारत
आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुधवारपासून एजबॅस्टन येथे सुरू होत
आहे. भारताला या सामन्यात विजयाची नितांत आवश्यकता आहे. या सामन्यात टीम इंडिया
आपल्या प्लेइंग-११ मध्ये काही बदल करू शकते. जसप्रीत बुमराह खेळणार नाही हे
निश्चित आहे. दुसरीकडे, इंग्लंडने दोन दिवसांपूर्वीच आपल्या प्लेइंग-११ ची घोषणा केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला अंतिम अकरा क्रिकेटपटूंच्या निवडीच्या बाबतीत
पारंपारिक विचारसरणीपासून दूर जावे लागेल. आणि फलंदाजांना अनुकूल असलेल्या
खेळपट्टीवर पूर्ण २० विकेट्स घेऊ शकतील असे गोलंदाज निवडावे लागतील. हेडिंग्ले
येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने ३७१ धावांचे
लक्ष्य सहज गाठल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने स्वतः कबूल
केले की, संघाला कुलदीप यादवची कमतरता भासत आहे.
पहिल्या
कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघ दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. पण
सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या हवामानामुळे चाहते आणि क्रिकेटपटूंची चिंता वाढवली
आहे. दरम्यान, भारतीय संघ आतापर्यंत या मैदानावर जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने
१९६७ मध्ये या मैदानावर पहिला सामना खेळला होता. विराट कोहली असो वा धोनी असो वा
द्रविड असो वा सौरव गांगुली, ५८ वर्षांत कोणताही भारतीय कर्णधार येथे जिंकलेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra