नाशिक, 2 जुलै (हिं.स.)।
नाशिक : नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशन, कालिका देवी मंदिर ट्रस्ट आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ऑलिम्पिक दिन आणि ऑलिम्पिक सप्ताहाची काल यशस्वी सांगता झाली. दिनांक २३ ते ३० जून पर्यंत क्रीडा सप्ताह अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या क्रीडा प्रकारांमध्ये तलवारबाजी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, फुटबॉल, गोल्फ, कॅरम, टेनिस व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना आकर्षक मेडल्स आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीमा शुल्क आणि जी. एस. टी. चे ऍडिशनल कमिशनर अजित दान, सिग्नेचर इंटरनॅशनल फूड लिमिटेडचे संचालक यतीन पटेल, पार्वती इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक विकास सिंग, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देहसमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, खजिनदार हेमंत पांडे, उपाध्यक्ष संदीप सोनावणे, नाशिक जिल्हा मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष व्यंकटेश मोरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, या क्रीडा सप्ताहाचे आयोजन प्रमुख आनंद खरे यांच्या हस्ते विविध खेळांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याचप्रमाणे हा ऑलिम्पिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सर्व खेळांचे आयोजक राजू शिंदे, शशांक वझे, किरण घोलप, गायत्री भिंगे, अमर भिगे, अभिषेक सोनावणे, भूषण भटाटे, नकुल चावरे, गणेश कलूगल, रिझवान शेख आणि त्यांचे सर्व सहकारी यांना ट्रॅक सूट देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बोलतांना अजित दान यांनी सांगितले की प्रत्येकाच्या आयुष्यात खेळाला फार महत्व आहे. आजच्या तरुण खेळाडूंनी अश्या उपक्रमाच्या माध्यमातून मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नांव आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि थेट ऑलीम्पिकमध्ये गाजवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी आमच्यासारखे सरकारी अधिकारी आणि विविध संस्था नक्कीच सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे सांगितले. यावेळी राहुल देशमुख, चंद्रशेखर सिंग, हेमंत पांडे, केशवअण्णा पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक दुधारे यांनी तर आभार प्रदर्शन आनंद खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद चकोर आणि अविनाश वाघ यांनी केले. हा ऑलिम्पिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सर्व खेळांचे संघटक राजू शिंदे, शशांक वझे, किरण घोलप, गायत्री भिंगे, अमर भिगे, अभिषेक सोनावणे, भूषण भटाटे, नकुल चावरे, गणेश कलूगल, रिझवान शेख, चिन्मय देशपांडे, आणि त्यांचे सर्व सहकारी यांना ट्रॅक सूट प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुढील वर्षी या सप्ताहामध्ये आणखी खेळांचा समावेश केला जाईल आणि आणखी मोठ्या प्रमाणात या सप्ताहाचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही ऑल गेम्स असोसिएशनचे पदाधिकारी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI