जळगाव, 2 जुलै (हिं.स.) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्यातर्फे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोलीस मुख्यालय, जळगाव येथील फुटबॉल मैदानावर करण्यात येणार आहे.
जिल्हास्तर स्पर्धेचा कार्यक्रम व सहभागासाठी वय पात्रता खालील प्रमाणे -
१५ वर्षे मुले खेळाडू दिनांक १ जानेवारी २०11किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, १७ वर्षे मुले खेळाडू दिनांक १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, १७ वर्षे मुली खेळाडू दि.१ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांनी स्पर्धेची प्रवेशिका तसेच खेळाडू ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने तयार करावयाचे आहे.
स्पर्धेला येताना खेळाडूंच्या जन्मतारखेच्या पुराव्याकरीता जन्मदाखला व आधारकार्ड / पासपोर्ट या कागदपत्राची मुख्याध्यापक यांनी स्वाक्षांकीत केलेली प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तसेच सन २०२5-26या वर्षात इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश झालेल्या परंतू रजिस्टर नंबर न मिळालेल्या खेळाडूंनी ओळखपत्रात रजि. नं. च्या जागी नवीन / NEW असे नमूद करावे व स्पर्धेला येताना ११ वी प्रवेशाच्या फी भरलेल्या पावतीची सत्यप्रत ओळखपत्रा सोबत जोडावी.
संघ नोंदणीसाठी अंतिम दिनांक ८ जुलै असून, https://dsojalgaon.co.in/school/login.php या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासोबतच www.subrotocup.in या सुब्रतो स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही संघ व खेळाडूंची नोंदणी व प्रवेश फी भरणे बंधनकारक आहे. केवळ नोंदणीकृत व प्रवेश फी भरलेले संघच स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
नियोजित तारखेनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही. जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरीता नमूद सूचनांनूसार शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर