अकोला, 3 जुलै, (हिं.स.)। अकोला शहरातील मोठी उमरी भागात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. पुरुषोत्तम वाकडे असं मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील रेल्वे रुळाच्या बाजूच्या खड्ड्यात एक अज्ञात व्यक्ती पडलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तात्काळ 108 रुग्णवाहिकेतून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले, रुग्णवाहिका चालक मुकेश ढोके यांनी अतिवेगाने रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचवली. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांच्या तपासात मृतकाचे नाव पुरुषोत्तम वाकडे असल्याचं निःपन्न झालं आहे.
मृतक हा मोठी उमरी परिसरातील रेल्वे रुळावरून शहरातील न्यू तापडिया नगर भागत जात असताना, रुळावर रेल्वे आल्याने तो बाजूला झाला. पण बाजूलाच असलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडल्याने पुरुषोत्तमचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस आणि रेल्वे पोलीस करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे