अकोला, 30 जुलै (हिं.स.)।
नागपंचमीनिमित्त येथील सर्पमित्रांकडून शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली. वनविभागाच्या सहकार्याने सापांविषयी शास्त्रीय माहिती देणारे पोस्टर प्रसिद्ध करून त्याचे वितरण करण्यात आले.
सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्या मार्गदर्शनात मोहिम राबविण्यात आली. जिल्हा रुग्णालय, महापालिका व विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांत, शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली व पोस्टर लावण्यात आले.
सापांविषयी जनमानसात असलेले गैरसमज दूर व्हावेत व त्यांना अचूक शास्त्रीय माहिती मिळावी यासाठी पोस्टरमध्ये माहिती देण्यात आली आहे.
सापांच्या जाती, महत्व, सुरक्षितता, उपचार, अंधश्रध्दा आदी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार व विविध विभागप्रमुखांनी या उपक्रमांचे कौतुक केले.
सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, सर्पमित्र संतोष वाकोडे, दीपक पाटील, राहुल साबळे, दीपक डाखोरे , तुषार आवारे आदींनी मोहिमेसाठी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे