छत्रपती संभाजीनगर, 31 जुलै (हिं.स.)। शिक्षकांनो जिल्ह्यातील दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती आहे. त्यांना जगायचे कसे, संकटांना सामोरे कसे जायचे हे शिकवा. संस्कारक्षम विद्यार्थी घडवा. असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेत केले.
कन्नड येथे महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, शिक्षणाधिकारी आश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती चव्हाण, विस्तार अधिकारी जे व्ही चौरे, गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर यावेळी उपस्थित होते.
नाचनवेल केंद्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांचे औक्षण करून स्वागत केले.
दीपप्रज्वलनानंतर शिवराय केंद्र हतनूर येथील विद्यार्थ्यांनी दशसूत्री पथनाट्य सादर केले.
प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केले. तर गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर, विस्तार अधिकारी लईक सोफी यांनीही यावेळी उपस्थित शिक्षिकांशी संवाद साधला. कार्यक्रमास तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील महिला शिक्षक, शाळाप्रमुख, मुख्याध्यापक, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis