प्रवासात महिलेला छळणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास
अकोला, 30 जुलै (हिं.स.)। भरतपूर ते अकोला एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचा छळ करणाऱ्या सह प्रवासी आरोपीस अकोला न्यायालयाने आज सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आज 30 जुलै 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक - 2 एस. आर. पहाडे यांनी आरोपी
court logo


अकोला, 30 जुलै (हिं.स.)। भरतपूर ते अकोला एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचा छळ करणाऱ्या सह प्रवासी आरोपीस अकोला न्यायालयाने आज सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

आज 30 जुलै 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक - 2 एस. आर. पहाडे यांनी आरोपी राजीव रामराव घाटोळ (वय- 56 वर्षे, राहणार सिध्दी विनायक मंदीराजवळ, राजराजेश्वर अपार्टमेंट, जठारपेठ, अकोला जि. अकोला) याला घटनेतील पिडीत महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 354-अ अंतर्गत दोषी ठरवुन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

घटनेची हकीकत अशी की, 25 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळी सहा वाजताचे दरम्यान पिडीत महिला तीची नातेवाईक व मुलांसोबत बौध्द धम्म परिषदेचा कार्यक्रम आटोपून भरतपूर वरुन अकोल्याकरीता एस.टी. बस ने निघाली होती. आरोपीने प्रथम पिडीतेला एस.टी. बस मध्ये बसण्याकरीता जागा दिली व तीच्या लगतच उभा राहिला. प्रवासादरम्यान आरोपी तेथून न हलता येणा-या जाणा-या प्रवाशांना जागा देवून तेथेच उभा राहिला व प्रवासादरम्यान पिडीतेचा लैगिक छळ केला. सुरुवातीला पिडीतेने त्याकडे दुर्लक्ष केले परंतु असह्य झाल्यावर तीने आरोपीला पकडून बसचे खाली आणले व स्वतः पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेली. त्यावरुन आरोपींविरुध्द जुने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास पी.एस.आय. रामराव राठोड यांनी केला. त्यानंतर उप. पोलीस अधिक्षक उमेश माने पाटील यांनी केला व तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण दहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान कलम 354-अ अंतर्गत दोषी ठरवुन तीन वर्ष सश्रम कारावास व रुपये तीन हजार दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पंधरा दिवसाची शिक्षा असा आदेश पारीत केला आहे.या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर व आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच सी.एम.एस. सेलचे पोलीस हेड कॉनस्टेबल श्रीकृष्ण पाचपोर यांनी प्रकरणात सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande