रत्नागिरी : वकील असल्याचे सांगून लांज्यात ४५ हजारांची फसवणूक; एकाला अटक
रत्नागिरी, 31 जुलै, (हिं. स.) : वकील असल्याची बतावणी करत एका वृद्धाची गाडी भाड्याने घेऊन भाडे न देता त्याच्याकडील दोन मोबाइल आणि नारळ घेऊन पसार झाल्याप्रकरणी रत्नागिरीतील जीवन गणपत जाधव (वय ५५) याला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल
रत्नागिरी : वकील असल्याचे सांगून लांज्यात ४५ हजारांची फसवणूक; एकाला अटक


रत्नागिरी, 31 जुलै, (हिं. स.) : वकील असल्याची बतावणी करत एका वृद्धाची गाडी भाड्याने घेऊन भाडे न देता त्याच्याकडील दोन मोबाइल आणि नारळ घेऊन पसार झाल्याप्रकरणी रत्नागिरीतील जीवन गणपत जाधव (वय ५५) याला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.

मांडवकरवाडी, आसगे येथील बाबाजी बुधाजी कोलापटे (वय ६२) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार नाखरे (ता. रत्नागिरी) येथील जीवन जाधव याने २३ जून ते १७ जुलै या कालावधीत मी वकील आहे असे सांगून कोलापटे यांची वॅगनार गाडी भाड्याने घेतली. तसेच त्यांना जेल कॅन्टीनमध्ये कामाला लावण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, त्याने गोड बोलून कोलापटे यांच्याकडील सुमारे सात हजार रुपये किमतीचे दोन जुने मोबाइल घेतले आणि त्यांच्या नातीच्या शांती विधीसाठी एक हजार ११० रुपयांचे नारळ घेऊन निघून गेला. मात्र गाडीचे ३७ हजार रुपयांचे भाडेही न देता परत न आल्यामुळे कोलापटे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

एकूण ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच लांजा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून जीवन जाधव याला अटक केली. तपासादरम्यान, जीवन जाधव याच्यावर जेजुरी (पुणे), सावंतवाडी व ओरोस (सिंधुदुर्ग) येथील पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

तो याआधी कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील होता, याचा तपास सुरू असून लांजा तालुक्यात याच पद्धतीने इतर कुणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. मैंदाड करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande