नाशिक, 30 जुलै, (हिं.स.)। ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून खळबळ उडाली आहे. तर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ठाकरे यांच्यासह संघटनेचे कोषाध्यक्ष सुनील निकम यांना निलंबित करून बदल्यांविरोधात न्यायालयाचे दार ठोठावल्याप्रकरणी वचपाच काढला असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा प्रचंड गाजल्या. विशेषतः ग्रामसेवक आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. पती-पत्ती एकत्रिकरण, दिव्यांग, मतीमंद पाल्य सवलत आदी सर्वच निकष गुंडाळून ठेवण्यात आले. ग्रामसेवक संघटनेने प्रशासनाच्या या मनमानीविरोधात औद्योगिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून अजूनही त्यावर सुनावणी सुरू अहे. दरम्यान, बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर एकमेकांचा वचपा काढण्याचे काम पध्दतशीरपणे सुरू आहे.
विशेष म्हणजे, महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींनीही याच काळात डोके वर काढल्याने या प्रकरणाचा बदली प्रकरणाशी काही संबंध आहे का, अशी चर्चा सुरू होती. अशातच एकाच दिवशी दोघा ग्रामसेवकांवर कारवाई केली. विशेष म्हणजे, संघटनेने बदल्यांविरोधात न्यायालयाचे दार ठोठावताच ग्रामपंचायतींची दप्तर तपासणीही 'ग्रामपंचायत'ने केली होती. त्यानंतर आता निलंबण्याचे हत्यार उपासण्यात आल्याने या कार्यवाहीचाही बदली प्रकरणाशी काही संबंध आहे काय, अशी चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV