परभणी, 31 जुलै (हिं.स.)।
बदलत्या काळानुसार तंत्रशिक्षणाचे महत्त्व वाढत चाललेले आहे, कारण येणार्या काळात रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची स्किल विकसित करता येते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा विकास झालेला पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व राज्य अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
येथील म. शि. प्र. मंडळ संचलित श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेशित नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक विकास समिती सदस्य दत्तात्रय अंभोरे, रमेश शेरे, इंजि. नारायण चौधरी यांच्यासह प्राचार्य शाहीद ठेकिया, प्रा. राहुल काळीकर, प्रा. विजय पाटील, प्रा. अमोल बेंडसुरे, प्रा. रसिका चौधरी, प्रा. प्रदीप रणखांब, प्रा. राम चव्हाण, प्रा. वीरभद्र हुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेतले पाहिजे. समाजात कसे वागावे याचे योग्य शिक्षण महाविद्यालयातच दिले जाते याच महाविद्यालयातून एक चांगला माणूस म्हणून बाहेर पडा, समाजाची व देशाची सेवा करा, असे आवाहनही पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्राचार्य डॉ. शाहिद ठेकीया यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांनी निवडलेला शिक्षणमार्ग रोजगाराभिमुख असून मेहनत, जिद्द आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळते, असे सांगितले. त्यांनी अभ्यासक्रम, परीक्षा प्रणाली, उपक्रम व शिस्तीबाबत सविस्तर माहिती दिली. पालकांनी महाविद्यालयाशी सतत संवादात राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आली. इंजी. नारायण चौधरी यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिले.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis