नाशिक, 30 जुलै, (हिं.स.)। इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची निमा हाऊस येथे औपचारिक भेट घेतली.
या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये भारत-जर्मनी व्यापार सहकार्य, नाशिकमधील औद्योगिक विकास, कौशल्य-आधारित प्रशिक्षण कार्यक्रम, आणि उच्च शिक्षणाच्या संधी यावर सखोल चर्चा झाली.
या वेळी इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सकडून संचालक बीना नायर यांनी चेंबरचे कार्यक्षेत्र, भारत-जर्मनी भागीदारीतील संधी, तसेच नाशिकसारख्या औद्योगिक शहरांना जागतिक दर्जाच्या शिक्षण व प्रशिक्षण प्रणालीशी जोडण्याची भूमिका विषद केली. त्यांनी स्थानिक उद्योगांशी सहकार्य वाढवण्याची आणि जागतिक पातळीवर प्रशिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या करण्याची तयारी दर्शवली.
निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी चेंबरच्या पुढाकाराचे स्वागत करत, नाशिकसारख्या प्रगत होत असलेल्या औद्योगिक शहरासाठी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणं ही मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी नाशिकच्या उद्योजक, शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांसाठी हे सहकार्य फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आणि भविष्यातील सहकार्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
या बैठकीस निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बुब, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र आहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, माजी अध्यक्ष निशिकांत आहिरे, कैलास पाटील, सी.एस. सिंग आदी उपस्थित होते. इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सकडून संचालक बीना नायर आणि प्रोग्रॅम मॅनेजर शिल्पा हर्फ्ट यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV