अमेरिका, जपानपर्यंत त्सुनामीचा इशारा जारी
मॉस्को, 30 जुलै (हिं.स.)।रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात आज, बुधवारी सकाळी ८.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र पॅसिफिक समुद्राखाली असल्याने पूर्वेकडील कुरील आयलंडवर त्सुनामी आली आहे. त्यानंतर प्रशांत महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे नुसार, रशियन समुद्राखाली ८.७ एवढ्या रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्यानंतर जपान आणि अमेरिकेच्या एजन्सींनी त्सुनामी अलर्ट (त्सुनामी वॉच) जारी केला आहे. या भूकंपाचे हादरे पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यांच्या रिंग म्हणजेच पार अगदी अमेरिकेपर्यंत बसले आहेत. भूकंपानंतर कामचटकाच्या किनारी भागात सुमारे ४ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उठल्या.रशियातील कामचटका येथे पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रशियाच्या किनाऱ्यावर तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये, जपान येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
अमेरिकन सामोआ, अंटार्क्टिका, कोलंबिया, कुक बेटे, कोस्टा रिका, एल साल्वाडोर, फिजी, गुआम, ग्वाटेमाला, हॉलंड आणि बेकर, इंडोनेशिया, जार्विस बेट, कार्माडिस बेट, किरिबाटी, मार्शल बेटे, मेक्सिको, मिडवे बेट, न्यूझीलंड, निकाराग्वा, पलाऊ, पालमायरा बेट, पनामा, पापुआ न्यू गिनी, पेरू, फिलीपिन्स, सामोआ, तैवान, टोंगा आणि वानुआतु या देशांना त्सुनामीचा तडाखा बसू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
भूकंप आणि त्सुनामीच्या धोक्यानंतर, रशियाच्या सखालिन प्रदेशातील सेवेरो-कुरिलस्क या छोट्या शहरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे आणि सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू केली आहे. पुढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागात धोकादायक त्सुनामी लाटा पोहोचू शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. जपानच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ एक फूट उंचीच्या पहिल्या त्सुनामी लाटा आल्या आहेत. यानंतर जपानने 20 लाख लोकांना बाहेर काढले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. याशिवाय, त्यांच्या फुकुशिमा अणुभट्टीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode