मास्को, 30 जुलै (हिं.स.) : रशियाच्या पूर्वेकडील कामचाटका द्वीपकल्पात बुधवारी 8.8 तीव्रतेचा भीषण भूकंप झाला आहे. हा भूकंप 1952 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपानंतर लगेचच रशिया, जपान, अमेरिका (हवाय, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन) यासह अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांनी रशियातील सेवेरो-कुरील्स्क या बंदर शहराला आपल्या कवेत घेतले. त्यानंतर शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून अनेक किनारी शहरांमधील बंदरे, हॉटेल्स आणि विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. जपानमध्येही किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना उंच ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतीय हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या या भूकंपाचा भारतावर कोणताही थेट धोका नाही, मात्र परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे. भीषण भूकंपामुळे रशियाला हादरा बसल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची अणुऊर्जा देखरेख संस्थेने (आयएईए) सांगितले की प्रारंभिक अहवालानुसार पॅसिफिक किनाऱ्यावरील अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित आहेत. आयएईएने जपानच्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
मुख्य घडामोडी:-
रशियाच्या सुदूर पूर्व भागात 8.8 तीव्रतेचा भूकंप, केंद्रबिंदू कामचाटका द्वीपकल्पापासून 133 किमी दूर समुद्रात.सेवेरो-कुरील्स्कमध्ये तीन सुनामी लाटा आल्या; तिसरी लाट सर्वात तीव्र होती, त्यामुळे तटीय भाग जलमय झाला असून रशियाच्या किनारी शहरांमध्ये जहाजे वाहून गेली. त्यानंतर 300 लोकांना बंदरातून हलवले गेले. भूकपानंतर जपानमध्ये 3 मीटरपर्यंत सुनामीची शक्यता वर्तवल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना उंच भागांमध्ये हलवले गेले. परंतु, नंतर त्सुनामीचा धोका कमी झाल्याने सुरुवातीला दिलेला हाय अलर्ट नंतर रिड्यूस करण्यात आला.
हवायमध्ये 10 फूट उंचीपर्यंतच्या लाटांचा इशारा देण्यात आला असून डिज्नी रिसॉर्टसह अनेक हॉटेल्स रिकामे, पर्यटकांना शाळांमध्ये हलवले गेले. कॅलिफोर्निया, अलास्का व अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जाहीर केला असून लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये समुद्रकिनार्यांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिलिपिन्स, इंडोनेशिया व चीनच्या पूर्व किनाऱ्यावरही अलर्ट जारी करण्यात आला असू येथे बहुतांश ठिकाणी लाटा 1 मीटरपेक्षा कमी आहेत. रशियाच्या पेट्रोपावलोव्स्क-कैमचात्स्की शहरात वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाइल सेवा ठप्प पडल्या आहेत. त्यासोबतच अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून कर्मचारी बाहेर काढले; जपान सरकार सतर्क असून, सध्या कोणताही गळतीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हवायमधील सर्व बंदरे बंद करण्यात आली असून अमेरिकन कोस्ट गार्डने सर्व जहाजांना समुद्रात थांबण्याचा आदेश दिला आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी