वेलिंग्टन, 30 जुलै (हिं.स.)। विमान कंपनी- एअर न्यूझीलंडने निखिल रविशंकर यांची कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. निखिल हे सध्या एअरलाइन कंपनीचे मुख्य डिजिटल अधिकारी आहेत आणि आता २० ऑक्टोबर रोजी ते ग्रेग फोरन यांच्याकडून पदभार स्वीकारतील. ग्रेग फोरन यांनी मार्चमध्ये एअर न्यूझीलंडच्या सीईओ पदाचा जबाबदारी सोडणार असल्याची घोषणा केली.
निखिल रविशंकर यांची सीईओ म्हणून नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा एअरलाइन एका मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे. कोरोना संकटामुळे या विमान कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलंय. एअर न्यूझीलंडच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेत निखिल यानी आधीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत, सीईओ म्हणून नियुक्ती कंपनीसाठी संकटमोचक ठरू शकते.
सप्टेंबर २०२१ मध्ये एअर न्यूझीलंडमध्ये रुजू झाल्यापासून निखिल रविशंकर यांनी एअर न्यूझीलंडमध्ये मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. एअर न्यूझीलंडमध्ये येण्यापूर्वी निखिल हे वेक्टर न्यूझीलंडमध्ये मुख्य डिजिटल अधिकारी होते. २०१७ पासून ते या कंपनीत डिजिटल आणि आयटी काम इत्यादींचं नेतृत्व करत होते. ते हेक्टर टेलिकॉम न्यूझीलंडमध्ये देखील कार्यरत होते.
निखिल यांनी ऑकलंड विद्यापीठातून सायन्स ग्रॅज्युएशन, कम्प्युटर सायन्स आणि कॉमर्स ग्रॅज्युएशन (ऑनर्स) पदवी घेतली आहे. ते विद्यापीठाच्या स्ट्रॅटेजिक सीआयओ प्रोग्रामचे सल्लागार आणि मार्गदर्शक आहेत. ते ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (एयुटी ) इन्फ्लुएंसर नेटवर्कचे सदस्य, न्यूझीलंड एशियन लीडर्सच्या बोर्डवर आणि ऑकलंड ब्लूज फाउंडेशनच्या सल्लागार समितीवर देखील आहेत.
एअर न्यूझीलंडबद्दल बोलायचं झालं तर, ते ऑकलंड, क्राइस्टचर्च आणि वेलिंग्टन सारख्या प्रमुख केंद्रांमधून काम करते. ही एअरलाइन्स ५० ठिकाणांना जोडते. अमेरिकेतील लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, ह्युस्टन, होनोलुलु आणि न्यू यॉर्क सारख्या शहरांमधून न्यूझीलंडला थेट उड्डाणं पुरवण्यात या विमान कंपनीची मोठी भूमिका आहे. या एअरलाइनची स्टार अलायन्ससोबत भागीदारी देखील आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode