अलिबाग, 30 जुलै, (हिं.स.) - प्राचीन आणि स्वदेशी खेळ महा लगोरी असोसिएशनच्या वतीने, तसेच प्राचीन आणि स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशनच्या मान्यतेने आयोजित पहिली राज्यस्तरीय ज्युनिअर लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच क्राईस्ट अकॅडमी स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे अत्यंत उत्साही वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख कराड पाटणा व नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख मा. शीतल सूर्यकांत कचरे, तसेच जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी, नवी मुंबई व नगरसेविका – दमयंती बबनशेठ आचरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महा लगोरी असोसिएशनचे डायरेक्टर भरत प्रल्हाद गुरव, असोसिएशनचे सचिव वैभव शिंदे, मुंबई जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव राकेश शेठ, तसेच अन्य मान्यवर, पदाधिकारी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत १२ जिल्ह्यांतील एकूण २१० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेची सुरुवात खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना देऊन, आणि स्व. संतोष गुरव यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी शीतल कचरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्व. संतोष गुरव यांनी मागील वर्षी याच ठिकाणी राज्यस्तरीय भव्य स्पर्धा आयोजित केली होती. दुर्दैवाने मी उपस्थित राहू शकले नाही. मात्र आज महा लगोरी संघटना जी कामगिरी करत आहे, ती खरोखरच गौरवास्पद आहे. संगणकीय युगात तरुणाई खेळांकडे पाठ फिरवते आहे, ही चिंताजनक बाब आहे. मात्र ‘लगोरी’सारख्या पारंपरिक खेळाला नवसंजीवनी देण्याचे काम या संघटनेमार्फत केले जात आहे, ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.”
लगोरी खेळाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी महाराष्ट्रातील लगोरीचे जनक, क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांनी तन मन धन अर्पून प्रसार केल्यामुळे भारतातील सर्व राज्यांसह जगभरातील तीस देशांमध्ये आज तो मोठ्या प्रमाणात खेळला जात असून त्यांचे हे कार्य संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे अनेकानी भाषणांतून अधोरेखित केले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ज्युनिअर गट – मुले: प्रथम क्रमांक: रायगड,द्वितीय क्रमांक: नांदेड,तृतीय क्रमांक: ठाणे आणि कोल्हापूर तर ज्युनिअर गट – मुलीध्ये प्रथम क्रमांक: रायगड,द्वितीय क्रमांक: ठाणे,तृतीय क्रमांक: पुणे आणि मुंबई टार्गेट लगोरी – मुले मध्ये प्रथम क्रमांक: पुणे,द्वितीय क्रमांक: बीड,तृतीय क्रमांक: मुंबई आणि नाशिक,टार्गेट लगोरी – मुली मध्ये प्रथम क्रमांक: मुंबई,द्वितीय क्रमांक: पुणे, मिक्स डबल्स गट : प्रथम क्रमांक: मुंबई उपनगर जिल्हा यांनी मिळविला .
बक्षीस वितरण समारंभ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त संदीप गुरव,ठाणे जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव वैभव शिंदे, भारतीय लगोरी महासंघाचे पदाधिकारी विजय लोणारी, बीड जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव प्रसाद साहू, नांदेड जिल्हा लगोरी संघटनेचे मोहम्मद अथर अहमद आणि शहीद उल्लाह,पुणे जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव राजू गोसावी, महा लगोरी असोसिएशनचे डायरेक्ट्रर भरत गुरव, कोल्हापूर चे दीपक सुतार, मुंबई उपनगरचे रज्जाक सर, सुवर्णा जोशी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ह्या स्पर्धेसाठी पंच म्हणून किरण सावंत, विजय लोणारी, प्रणव डोके, सुधीर नाझरे, राकेश, राज बिरगावले, हर्ष, सिद्धी गुरव यांनी जबाबदारी पार पाडली.
रायगड जिल्ह्याने दोन्ही गटात बाजी मारत आपली चुणूक सिद्ध केली असून ह्या स्पर्धेतून निवडलेला महाराष्ट्राचा संघ दिनांक २२ ते २४ ऑगस्ट रोजी चिपळूण, सावर्डे येथे होणाऱ्या ९ व्या ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant