लंडन, 31 जुलै, (हिं.स.) भारत
आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा
सामना आजपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार ऑली पोप
याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह गिलने सलग
पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावली आहे.
शुभमन
गिलने सध्याच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत सर्व पाचही वेळेस नाणेफेक गमावली आहे.
त्याचवेळी भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमध्ये सलग १५ व्यांदा नाणेफेक गमावली आहे. कर्णधार म्हणून ऑली पोपने कसोटी
सामन्यात नाणेफेक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत
संघाने सर्व पाचही नाणेफेक गमावण्याची ही १४ वी वेळ आहे. २१ व्या शतकात यापूर्वी
फक्त एकदाच असे घडले आहे. जेव्हा भारताने २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर सर्व पाचही नाणेफेकीचे
कौल गमावले होते.
पाचव्या
सामन्यात भारताने चार बदल केले आहेत. कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, ध्रुव जुरेलला ऋषभ पंतच्या जागी, करुण नायरला शार्दुल ठाकूरच्या जागी, प्रसिद्ध कृष्णाला जसप्रीत बुमराहच्या
जागी आणि आकाश दीपला अंशुल कंबोजच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तर इंग्लंडनेही अंतिम अकरा क्रिकेटपटूंमध्ये एकूण चार बदल केले आहेत.
बेन स्टोक्स, ब्रायडन
कार्स, जोफ्रा
आर्चर आणि लियाम डॉसन हे या सामन्यात खेळणार नाहीत. स्टोक्सच्या जागी जेकब बेथेलला संधी मिळाली आहे. तो सहाव्या
क्रमांकावर फलंदाजी करेल.गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांचाही
समावेश करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra