जालना - निकृष्ट दर्जाची कामाची तक्रार केली म्हणून शिक्षकाला मारहाण
जालना, 30 जुलै, (हिं.स.)। तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीनुसार वरखेडा (सिंदखेड) येथील सरपंच व त्यांच्या मुलाने गावातील शिक्षकाला रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शिक्
जालना - निकृष्ट दर्जाची कामाची तक्रार केली म्हणून शिक्षकाला मारहाण


जालना, 30 जुलै, (हिं.स.)। तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीनुसार वरखेडा (सिंदखेड) येथील सरपंच व त्यांच्या मुलाने गावातील शिक्षकाला रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शिक्षकाच्या डोक्यात लोखंडी हुकने वार करून जखमी करण्यात आले असून, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तुळशीराम कमलाकर शेवाळे (वय 36), रा. वरखेडा सिंदखेड, हे श्रीरंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघुळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गावातील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची माहिती मिळाल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एक विनंती अर्ज पाठवला होता.

या प्रकाराचा राग मनात धरून, दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 29 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता शेवाळे हे राशन घेण्यासाठी लाईनमध्ये उभे असताना, सरपंच सर्जेराव शेवाळे व त्यांचा मुलगा प्रदीप शेवाळे यांनी त्यांना उद्देशून शिवीगाळ केली. यानंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण करत, प्रदीप शेवाळे यांनी पोते उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हुकने त्यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाला.

तसेच त्यांच्या पाठीवर, पोटावर मुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या पत्नी व मुलांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. यावेळी उपस्थित असलेले सोनाजी राजू शेवाळे, गोकुळ काटकर, मंदाताई घडलिंग व इतर ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकार पाहिला.

श्री. तुळशीराम शेवाळे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, “माझ्या कुटुंबाला काहीही झाले, तर त्याला जबाबदार सरपंच सर्जेराव शेवाळे आणि त्यांचा मुलगा प्रदीप शेवाळे असतील.” या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.

या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Amit Kulkarni


 rajesh pande