अकोला, 31 जुलै (हिं.स.) : अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत आहे. यावर अंकुश मिळविण्याकरिता अकोला पोलिसांनी गुन्हेगारांची धींड काढत त्यांना नागरिकांची माफी मागायला लावण्याला भाग पाडले आहे. अशातच जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या परिसरातील आसिफ खान याने दुचाकी वरून अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून पाईपने मारहाण केली असल्याच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपीचा तपास घेऊन त्याला तात्काळ अटक केली व गुन्हा दाखल केला. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपीची परिसरात धींड काढून त्याला नागरिकांची माफी मागायला भाग पाडले. तसेच आणखीन पुरावे गोळा करण्यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे