रत्नागिरी : मामानेच केला भाच्याचा निर्घृण खून
रत्नागिरी, 3 ऑगस्ट, (हिं. स.) : मिरकरवाडा खडप मोहल्ल्यात शनिवारी केलेला खून मामानेच केल्याचे उघड झाले आहे. प्रेयसीशी वारंवार फोनवर बोलण्याच्या सवयीवरून मामाभाच्यात झालेल्या वादातून हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शहर पोलिसांनी
रत्नागिरी : मामानेच केला भाच्याचा निर्घृण खून


रत्नागिरी, 3 ऑगस्ट, (हिं. स.) : मिरकरवाडा खडप मोहल्ल्यात शनिवारी केलेला खून मामानेच केल्याचे उघड झाले आहे.

प्रेयसीशी वारंवार फोनवर बोलण्याच्या सवयीवरून मामाभाच्यात झालेल्या वादातून हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणातील दोन संशयितांना अवघ्या काही तासांत रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव प्रिन्स मंगरू निषाद (वय १९, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे असून, तो मिरकरवाडा येथे एका मोबाइल शॉपीच्या फर्निचर कामासाठी आलेला होता. त्याच्यासोबत त्याचा चुलत मामा नीरज निषाद आणि अनुज चौरसिया हेही कामावर होते. हे तिघेही मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील असून, ठेकेदार रविकुमार भारती यांच्यामार्फत त्यांनी काम स्वीकारले होते.

प्रिन्स कामाच्या वेळेस सतत आपल्या प्रेयसीशी फोनवर बोलत असतो, यामुळे त्याचा मामा नीरज याला संताप येत असे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. वादाच्या रागातून नीरज निषाद आणि अनुज चौरसिया यांनी प्रिन्सला बेदम मारहाण केली. रागाच्या भरात नीरजने फर्निचर कटिंगसाठी वापरली जाणारी आरी उचलून प्रिन्सच्या छातीत भोसकली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

घटनेनंतर नीरज निषाद आणि अनुज चौरसिया घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र ठेकेदार रविकुमार भारती याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांचे मोबाइल नंबर मिळवून ठावठिकाणा शोधून काढला. ते रत्नागिरी रेल्वे स्थानकात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande