परभणी, 1 ऑगस्ट (हिं.स.) : महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
महसूल दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, अनिता भालेराव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे एनआयसीचे देवेंद्रसिंह आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.जिल्हाधिकरी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. यावेळी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis