रत्नागिरी, 01 ऑगस्ट, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी पत्रकार हेमंत वणजू यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'सहकार पॅनल'ने १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. ही निवडणूक जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. यंदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सहकार पॅनलविरोधात उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही
राजापूरचे आमदार किरण सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात चर्चा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उबाठा गटाने आपले सर्व उमेदवार मागे घेतले. यामुळे सहकार पॅनलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात रामचंद्र गराटे, प्रभाकर शेट्ये, चंद्रकांत परवडी, रमेश दळवी, अविनाश जाधव, सिराज घारे, सुनील टेरवकर, प्रताप सावंत, प्रसन्न दामले, सुरेंद्र लाड, मनोज कदम, हेमंत वणजु, स्मिता दळवी आणि प्राची टिळेकर यांचा समावेश आहे.आज सकाळी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यानुसार पत्रकार हेमंत वणजू यांची अध्यक्ष म्हणून आणि प्रताप सावंत यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी