मुंबई, 31 जुलै, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार, आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक रणनीतीवर सखोल चर्चा होत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक माजी आमदार आणि खासदार यांना एक मंडळ दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणी करण्याचा संकल्पही या बैठकीत करण्यात आला.
या बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात येत असून, बूथस्तरापासून मतदान केंद्रांपर्यंतची मोर्चेबांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, संपर्क मोहिमा यावर भर दिला जात आहे. कार्यकर्त्यांचा जोम, जनसंपर्क आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी खासदार, माजी आमदार तसेच प्रदेश संघटनमंत्री, उपस्थित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर