नांदेड, 31 जुलै (हिं.स.) : नांदेडमध्ये एका १९ वर्षीय तरुणीला बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेल्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींसह दुचाकी देखील जप्त केल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे.
नांदेड शहरात भर रस्त्यातून या तरुणीला दोन तरुणांनी दुचाकी वर पळवून नेले होते. पोलीस मागावर असल्याने आरोपीनी तरुणीला अर्ध्या रस्त्यात सोडून पळ काढला. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर, त्याचा अन्य एक साथीदार फरार होता . त्यालाही पकडण्यात आले आहे. १९ वर्षीय तरुणी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होती. यावेळी दुचाकीवर दोन तरुण आले. त्यातील एकाने तिला फरकटत नेलं. मुलीने आरडाओरड केली. तरीही तरुणाने तिला बळजबरीने उचलून नेलं. या मार्गावर नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती. मात्र, एकानेही धाडस दाखवत, पुढे येत तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
दरम्यान, या अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीवरुन तरुणीला घेऊन जाणाऱ्या दोघांचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच आरोपींनी तरुणीला गोकुळनगर भागातील रेल्वे स्टेशन परिसरात सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या काही तासातच २१ वर्षीय आरोपीला देगलूर नाका भागातून अटक केली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव हे वजीराबाद पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis