पुणे, 31 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांमधून बेरोजगार अभियंते रस्त्यावर उतरले होते. यात ३५० हून अधिक अभियंत्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि रोजगार विभागाचे राज्य संयोजक धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी केले. इंजिनिअर्स असोसिएशन या तरुण अभियंत्यांच्या संघटनेने राज्यभरातून आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे या आंदोलकांशी थेट संवाद साधला आणि पुणे दौऱ्यात प्रत्यक्ष भेटीचे आश्वासन दिले. “रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे असून, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल.” असे आश्वासन सपकाळ यांनी दिले. ज्येष्ठ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन उपस्थित युवकांशी संवाद साधला.
काँग्रेस पक्षाने राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत ठोस निर्णय न झाल्यास संभाजी नगरमधील WALMI च्या मुख्य गेटसमोर अनिश्चित कालीन सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी येत्या आठवड्यात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती धनंजय शिंदे यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने