रत्नागिरी, 31 जुलै, (हिं. स.) : दळवटणे (ता. चिपळूण) येथील माजी सरपंच सचिन सुधाकर शेट्ये यांना त्यांच्या सरपंच कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय 'ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोणावळा येथे पार पडलेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, जालतज्ज्ञ पाटील आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सचिन शेट्ये यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, स्थानिक पातळीवरील लोकसहभाग व पर्यावरणपूरक उपक्रम यामध्ये भरीव कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली दळवटणे गावाने अनेक विकासकामांत सातत्यपूर्ण यश मिळवले.
या सन्मानप्रसंगी भावना व्यक्त करताना सचिन शेट्ये म्हणाले, हा सन्मान माझा नसून दळवटणे गावाचा आहे. ग्रामपंचायतीतील सहकारी, ग्रामस्थ आणि माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्वांचे मी आभारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी