सोलापूर, 31 जुलै, (हिं.स.)। एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे निकटवर्तीय व कट्टर काँग्रेस समर्थक सातलिंग शटगार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शटगार यांच्याकडे यापूर्वी वरिष्ठ उपाध्यक्ष, प्रसिद्धीप्रमुख या पदांची जबाबदारी होती. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले प्रा. अशोक निंबर्गी यांच्यासह नंदकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे, राजकुमार पवार यांचीही नावे चर्चेत होती. प्रदेश कमिटीकडून शटगार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. संघटनेचा मोठा अनुभव असलेल्या शटगार यांच्या नियुक्तीने तालुक्यासह जिल्ह्यात संघटनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी मंत्री म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरी शटगार हे काँग्रेससोबत राहिल्याने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी लागली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीवरून ही निवड करण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शटगार यांना संधी दिली आहे. नंदकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे, राजकुमार पवार यांनी मुलाखती दिल्या होत्या तर शेवटच्या टप्प्यात प्रा. निंबर्गी यांचे नाव समोर आले होते. पण कमिटीने शटगार यांना संधी दिली.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड