परभणी, 31 जुलै (हिं.स.)।
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित पोलिस अधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, या आशयाच्या दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू पोलिस अधिकार्यांनी केलेल्या मारहाणीत नव्हे, तर तो नैसर्गिकरीत्या झाला असा दावा राज्य सरकारने केला होता. त्यावर आक्षेप नोंदवून सूर्यवंशी कुटूंबियांनी त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती, न्यायालयाने त्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकार्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु, या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आक्षेप नोंदवला होता. तो आक्षेप अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान, या प्रकरणात ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटूंबियांतर्फे युक्तीवाद केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis