सोलापूर, 31 जुलै, (हिं.स.)। मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकारकडून तीन कोटींचा निधी मिळाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी सरकारने सुरुवातीला एक कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र, आता नव्या निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुल योजना विकास निधी हा एक कोटीवरुन पाच कोटी रुपये इतका करण्यात आला आहे.
त्यानुसार मंद्रूपच्या संकुलासाठी त्यातील तीन कोटी निधीला सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. निधी मिळाल्याने मंद्रूपचे क्रीडा संकुल आता अधिक सोयी - सुविधायुक्त होणार आहे. याचा खेळाडूंना लाभ होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचे आमदा देशमुख यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड