महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : भुपेंद्र यादव
खा. धनंजय महाडिक यांनी दिले निवेदन दिले कोल्हापूर , 31 जुलै (हिं.स.) : खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची भेट घेवून निवेदन दिले. याबाबत कायदेशीर पर्याय तपासून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदा
खा. धनंजय महाडिक ना. भुपेंद्र यादव यांना माधुरी हत्तीणीबाबत निवेदन देताना


खा. धनंजय महाडिक यांनी दिले निवेदन दिले

कोल्हापूर , 31 जुलै (हिं.स.) : खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची भेट घेवून निवेदन दिले. याबाबत कायदेशीर पर्याय तपासून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार यादव यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हयातील नांदणी मधील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील हत्तीणीला गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. पण नांदणी गावासह अनेक नागरिक आणि भाविकांच्या श्रध्दा महादेवी हत्तीणीशी जोडल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला नांदणीमधून नेल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यामुळे जनभावनेचा विचार करून महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्द करावी, अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे केली आहे.

देशातील काही प्राणीप्रेमी संघटनांच्या तक्रारीनंतर, उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर वनविभागाकडून महादेवी हत्तीणीला गुजरातमध्ये नेण्यात आले. या निर्णयामुळे नांदणी आणि शिरोळ तालुक्यातील भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या हत्तीणीवर प्रेम करणार्‍या स्थानिक नागरिकांनी गेल्या चार दिवसात केलेली आंदोलने, त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया याबाबत खासदार महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांना माहिती दिली. अशा परिस्थितीत जनभावनेचा विचार करून महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये आणावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे. या हत्तीणीच्या आरोग्य रक्षणासाठी तसेच पालन पोषणासाठी योग्य व्यवस्था केली जाईल. त्यासाठी आपण लक्ष देवून हत्तीणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. नांदणीमधील हजारो लोकांची संवेदनशिलता, भावना लक्षात घेवून महादेवी हत्तीणीला नांदणीतील जैन मठाकडे सुपूर्द करावे, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे. त्यावर सर्व कायदेशीर बाजू तपासून, या प्रश्‍नी पुढील आठवडयात बैठक घेवू आणि योग्य तोडगा निघण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande