रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.) : युरोपमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणी तेथे सलग तिसऱ्या वर्षी गणेशोत्सव साजरा करत आहेत. या उत्सवासाठी गुहागरातून गणेशमूर्ती युरोपमध्ये नेण्यात आली आहे. पुढील काही दिवस ही मंडळी आपले काम सांभाळून दररोज आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम करणार आहेत.
महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सर्व तरुण मंडळी महाराष्ट्रातील आहेत. तालुक्यातील निखिल सुनील रेवाळे हा तरुणही जॅग्वार लँड रोवर या जगप्रसिद्ध कंपनीत कामाला आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी गुहागरातील गणेशमूर्ती असावी, म्हणून काही दिवसांपूर्वी आपल्या घरी आला होता. गुहागर खालचापाट येथील मूर्तिकार मंगेश घोरपडे यांच्याकडून आकर्षक मूर्ती बनवून घेतली. गेल्या १९ ऑगस्टला या मूर्तीला चांगले पॅकिंग करून आपल्यासोबत युरोपमध्ये घेऊन गेला आहे. निखिल खास गणेशमूर्ती आणण्यासाठी इतक्या दूरहून आपल्या गावी आला होता.
गणेशोत्सवात प्रत्येकजण आपली कामे सांभाळून गणेशाची सेवा करणार आहेत. आम्ही त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत असलो तरी आपल्या गावातील गणेशोत्सवाची जास्त आठवण येत असल्याचे त्याने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी